LPG Cylinder Booking : कॉलवर सिलेंडर बुक होत नाही? WhatsApp सह या 4 सोप्या मार्गांनी करा बुकिंग, अन्यथा अशी करा तक्रार
आजकाल अनेक ग्राहकांना LPG गॅस सिलेंडर बुक करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः फोन कॉलद्वारे सिलेंडर बुकिंग करताना कॉल लागत नाही किंवा बुकिंग होत नाही अशा तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागतात. मात्र आता ग्राहकांसाठी फोन कॉलव्यतिरिक्त इतर अनेक सोपे पर्याय उपलब्ध झाले आहेत. WhatsApp, मिस्ड कॉल, SMS आणि मोबाइल अॅप किंवा ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून घरबसल्या LPG सिलेंडर सहज बुक करता येतो. त्यामुळे एजन्सीकडे जाण्याची गरजही उरत नाही.
WhatsApp वरून LPG सिलेंडर बुकिंग कसे कराल?
आजच्या डिजिटल युगात WhatsApp चा वापर करूनही गॅस सिलेंडर बुक करता येतो. यासाठी ग्राहकांनी आपल्या रजिस्टर मोबाइल नंबरवरून संबंधित गॅस कंपनीच्या WhatsApp नंबरवर साधा मेसेज पाठवायचा असतो. त्यानंतर काही मिनिटांतच बुकिंग प्रक्रिया पूर्ण होते आणि त्याचा संदेशही मोबाइलवर मिळतो.
Indane Gas च्या ग्राहकांनी 7588888824 या नंबरवर REFILL असा मेसेज पाठवावा.
HP Gas चे ग्राहक 9222201122 या नंबरवर Hi किंवा Book असा मेसेज पाठवू शकतात.
Bharat Gas चे ग्राहक 1800224344 या नंबरवर Hi किंवा Book असा मेसेज पाठवून सिलेंडर बुक करू शकतात.
मिस्ड कॉल देऊन LPG सिलेंडर बुकिंग
ग्राहकांसाठी आणखी एक सोपा पर्याय म्हणजे मिस्ड कॉल बुकिंग. यासाठी ग्राहकांनी आपल्या रजिस्टर मोबाइल नंबरवरून दिलेल्या नंबरवर मिस्ड कॉल द्यायचा असतो. त्यानंतर आपोआप सिलेंडर बुकिंगची प्रक्रिया सुरू होते आणि बुकिंगचा संदेश मोबाइलवर प्राप्त होतो.
Indane Gas ग्राहक 8454955555 या नंबरवर मिस्ड कॉल देऊन सिलेंडर बुक करू शकतात.
HP Gas चे ग्राहक 9493602222 या नंबरवर मिस्ड कॉल देऊन बुकिंग करू शकतात.
SMS द्वारे LPG सिलेंडर बुकिंग
SMS च्या माध्यमातूनही LPG सिलेंडर बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र हा SMS आपल्या गॅस कनेक्शनशी लिंक असलेल्या रजिस्टर मोबाइल नंबरवरूनच पाठवणे आवश्यक आहे.
Indane Gas ग्राहकांनी 7718955555 या नंबरवर REFILL असा SMS पाठवावा.
Bharat Gas ग्राहकांनी 7715012345 किंवा 7718012345 या नंबरवर LPG असा SMS पाठवून सिलेंडर बुक करू शकतात.
मोबाइल अॅप किंवा पेमेंट अॅपद्वारे बुकिंग
गॅस कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी अधिकृत मोबाइल अॅपही उपलब्ध करून दिले आहेत. ग्राहक हे अॅप डाउनलोड करून लॉगिन केल्यानंतर सहजपणे सिलेंडर बुक करू शकतात. याशिवाय केंद्र सरकारचे UMANG अॅप वापरूनही LPG बुकिंग करता येते.
तसेच आता अनेक डिजिटल पेमेंट अॅप्सवरही LPG बुकिंगची सुविधा देण्यात आली आहे. Paytm, PhonePe आणि Amazon Pay सारख्या अॅप्सच्या मदतीनेही ग्राहक घरबसल्या काही मिनिटांत सिलेंडर बुक करू शकतात.
सिलेंडर डिलिव्हरी न झाल्यास तक्रार कशी कराल?
काही वेळा सिलेंडर बुक केल्यानंतरही वेळेवर डिलिव्हरी होत नाही. अशा परिस्थितीत ग्राहकांनी तक्रार नोंदवण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. ग्राहक खाली दिलेल्या टोल फ्री नंबरवर कॉल करून तक्रार करू शकतात.
Indane Gas : 1800-2333-555
Bharat Gas : 1800-22-4344
HP Gas : 1800-2333-555
याशिवाय ग्राहक संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतात. UMANG अॅप च्या माध्यमातूनही तक्रार नोंदवता येते आणि त्याचा स्टेटस ट्रॅक करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. तसेच सोशल मीडियावर संबंधित गॅस कंपनीला टॅग करूनही ग्राहक आपली समस्या मांडू शकतात.
अशा प्रकारे फोन कॉलवर बुकिंग होत नसले तरीही WhatsApp, मिस्ड कॉल, SMS आणि मोबाइल अॅपसारख्या डिजिटल पर्यायांमुळे LPG सिलेंडर बुकिंग प्रक्रिया आता अधिक सोपी आणि जलद झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी या सुविधांचा उपयोग करून घरबसल्या सहज गॅस सिलेंडर बुक करावा.